पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:58+5:302021-07-18T04:24:58+5:30
मागील वर्षी पावसाने उडीद, मूग, कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके हातची गेली होती. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ...
मागील वर्षी पावसाने उडीद, मूग, कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके हातची गेली होती. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा मिळणारच अशी आशा लागली होती. परंतु, शासनाच्या नाकर्तेपणामुळे पीकविमा मदत आतापर्यंतसुद्धा मिळाली नाही. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनासुद्धा वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीच हालचाल झाली नाही. पीकविमा मदत मिळत नसल्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा अत्यंत कमी प्रमाणात भरला आहे. पीक जाऊनसुद्धा कोरोनासारख्या महामारीने आणि महागाईने सामान्य माणसाचे पुरते हाल होत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी सिंदखेडराजा येथील शेतकरी श्रीराम सरकटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
पीकविमा कंपनीवर कारवाई केव्हा
पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मागील वर्षी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच संबंधित विमा कंपनीवर गुन्हा दाखल केव्हा होणार, असा प्रश्न शेतकरी श्रीराम सरकटे
यांनी उपस्थित केला आहे.