कलावंतांचे मानधन खात्यात जमा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:39+5:302021-04-19T04:31:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मेहकर : शासनाच्या वृद्ध साहित्यिक कलाकार योजनेंतर्गत मागील चार महिन्यांचे कलावंतांचे मानधन थकल्याने कलावंतांसमोर आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : शासनाच्या वृद्ध साहित्यिक कलाकार योजनेंतर्गत मागील चार महिन्यांचे कलावंतांचे मानधन थकल्याने कलावंतांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने तत्काळ कलावंताचे थकलेले मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी बुलडाणा जिल्हा कलावंत समितीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़.
राज्याचे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे़. या काळात राज्यातील लोककलावंतांची दयनीय अवस्था झाली असून, त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे़. मागील चार महिन्यांपासून शासनाने वृद्ध साहित्यिक कलाकार योजनेंतर्गत कलावंतांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा न केल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे़. शासन या योजनेंतर्गत ‘अ’ श्रेणीतील कलावंतांना ३ हजार १५० रुपये, ‘ब’ श्रेणीतील कलावंतांना २ हजार ७०० रुपये व ‘क’ श्रेणीतील कलावंतांना २ हजार २५० रुपये याप्रमाणे मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा करते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून मानधन जमा न झाल्याने कलावंतांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे़. शासनाने तत्काळ कलावंतांचे थकीत मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे व त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी बुलडाणा जिल्हा कलावंत समितीचे जिल्हाध्यक्ष रफीक कुरेशी, कलावंत प्रमोद दांडगे, हामिद मिर्झा, आत्माराम साखरे, आदींनी निवेदनाद्वारे केली आहे़.