वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रिक्त पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:20+5:302021-06-06T04:26:20+5:30
चिखली : तालुक्यातील एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त असून, कोरोनाच्या ...
चिखली : तालुक्यातील एकलारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे डॉ. सत्येंद्र भुसारी व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोविड तपासणी, लसीकरण, विलगीकरण, औषधोपचार आरोग्य कर्मचारी, कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहेत. याव्यतिरिक्त उपलब्ध असलेले कर्मचारी इतर कामांमध्ये व्यस्त असतात, त्यातच आता पावसाळा सुरू होत असल्याने साथीचे आजार जोर धरू शकतात. या पृष्ठभूमीवर एकलारा प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच एकलारा केंद्रांतर्गत शेलसूर उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. बोरगाव काकडे उपकेंद्रावर एएनएमचे पद रिक्त आहे, तर प्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा येथे एमपीडब्ल्यू, एलएसव्ही व कनिष्ठ सहायक ही पदेसुद्धा रिक्त आहेत. तसेच १० महिन्यांपासून येथील आरोग्य अधिकारी रजेवर गेलेले आहे, परिणामी रिक्त पदांचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडतो. पयार्याने रुग्णांना वेळीच उपचार करणे अवघड झाले आहे. याची दखल घेत रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोकराव पडघान, जि. प. सभापती ज्योती पडघान, लक्ष्मणराव आंभोरे, शिवनारायण म्हस्के, रामेश्वर भुसारी, एकलारा सरपंच छाया गजानन आंभोरे, पाटोदा सरपंच तृप्ती सोळंकी, सावंगी गवळी सरपंच प्रदीप पाटील, बोरगाव काकडे सरपंच सुनंदा विनय सोरमारे, भोरसा भोरसी माजी सरपंच गीता समाधान आकाळ, भारत गवई, निवृत्ती भुसारी, जाईदेवी पडघान आदींची स्वाक्षरी आहे.