बालगृहातील मुलांच्या आत्महत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 11:38 AM2020-12-07T11:38:15+5:302020-12-07T11:38:26+5:30
Buldhana News दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: येथील शासकीय बालसुधारगृहात शनिवारी दोन मुलांनी आत्महत्या केल्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी एक निवेदन प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बुलडाणा शहरातील चिखली रोडनजीक असलेल्या शासकीय बालसुधारगृहात शनिवारी १५ वर्षे व १७ वर्षे वयाच्या दोन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटनाही सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता मुख्य जिल्हा व सत्र न्यायायाधीश यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. सोबतच प्रथमदर्शनी त्या दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले होते.
आता या प्रकरणात आ. संजय गायकवाड यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे. सोबतच बालसुधारगृह हे खासगी मालकीच्या जागेत असून मुलांची आत्महत्या ही तेथील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाली असल्याचा ठपका मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी ठेवला आहे. सोबतच येथील सोयी-सुविधांची स्थिती, कार्यरत अधिकारी, यांचे याकडे दुर्लक्ष होते का, याबाबत चौकशी व्हावी व प्रसंगी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.