स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:50+5:302021-03-04T05:04:50+5:30
राहेरी बु. : चार ते पाच हजार लाेकसंख्या असलेल्या राहेरी बु. येथे स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना ...
राहेरी बु. : चार ते पाच हजार लाेकसंख्या असलेल्या राहेरी बु. येथे स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना कसरत करावी लागते. स्मशानभूमीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राहेरी बु. गावात हिंदू स्मशानभूमीच नाही. त्यामुळे औरंगाबाद-नागपूर या राज्य महामार्गावर खडकपूर्णा नदीवरील पुलाच्या खाली मृतकांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. हे अंतर गावापासून एक ते दीड किलोमीटर आहे. त्यामुळे नागरिकांना एक ते दीड किलोमीटचे अंतर राष्ट्रीय महामार्गाने पार करावे लागते. महामार्गावरून जात असताना वर्दळीचे व मोठ्या प्रमाणावर वाहने चालतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाखालील स्मशानभूमीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये मृतकांवर अत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना कसरत करावी लागते. ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळील जागेवर हिंदू स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाच लाख रुपयांचा निधी स्मशानभूमीसाठी मंजूर करून आणलेला आहे. त्या निधीचा वापर करून लवकरात लवकर त्या जागेवर स्मशानभूमीचे काम सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी मागील ग्रामपंचायतीने पाच लाख रुपये निधी मंजूर केला आहे. आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ व हे पाच लाख रुपये स्मशानभूमीसाठीच वापरले जातील.
रवी बरंडे, सरपंच, राहेरी बु.
गावात मराठा समाज मोठा असून, या ठिकाणी मराठा समाजाची स्मशानभूमी नाही, ही एक शोकांतिका आहे. आता पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून स्मशानभूमीचे बांधकाम आरक्षित जागेवर करावे.
धनंजय देशमुख, राहेरी बु.