किनगाव जट्टू बस स्थानकावर गतिरोधक बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:54+5:302021-07-29T04:33:54+5:30
दुसरबीड ते लोणार रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावतात. परिसरातील सहा खेड्यांतील नागरिकांना ...
दुसरबीड ते लोणार रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने धावतात. परिसरातील सहा खेड्यांतील नागरिकांना बाहेरगावी कोठेही जायचे असल्यास किनगाव जट्टूपासून प्रवासास सुरुवात करावी लागत असल्याने येथे नेहमी प्रवासी वर्गाची वर्दळ राहते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेल्स व इतर व्यावसायिकांची दुकाने असून बाजूलाच एक ली ते चाैथीपर्यंत मुलींची जिल्हा परिषद कन्या शाळा असल्याने लहान मुलींना सुद्धा रस्ता ओलांडून पलीकडे जावे लागते. बस स्थानकावर वळण रस्ता असून दोन्ही बाजूने उताराचा रस्ता असल्याने वळण रस्त्याचा अंदाज येत नाही. अशावेळी चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने येथे किरकोळ अपघात होतात. माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गतिरोधक बसविण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्यावर साचते पाणी
बस स्थानकावर रस्त्याचा थोडा खोलगट भाग असल्याने पाऊस पडला की रस्त्यावर पाणी साचते. या खडड्यांमधून वाहने गेल्यास त्यातील पाणी बसची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे या खडड्यांमध्ये साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे.