पोलिस निरीक्षकाच्या नावे दारुची मागणी; महिला पोलिस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 06:28 PM2020-05-13T18:28:40+5:302020-05-13T18:33:40+5:30
पोलिस निरिक्षकांचे नाव सांगून दारूची मागणी करणे, एका पोलिस महिलेस चांगलेच महागात पडले.
खामगाव: येथील एका पोलिस निरिक्षकांचे नाव सांगून दारूची मागणी करणे, एका पोलिस महिलेस चांगलेच महागात पडले. चौकशीअंती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी संबंधित महिलेला निलंबित केले. त्यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव येथील नियंत्रणकक्षात कार्यरत असलेल्या महिला पोहेकॉ अनिता इर्शीद १० मे रोजी शेगाव रोडवरील एका हॉटेलात गेल्या. ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख यांना पिण्यासाठी दारू हवी असल्याचे सांगत हॉटेलवरील पर्यवेक्षकाला दारूची मागणी केली. दारू न दिल्यास कारवाईची इशाराही दिला. संबंधित हॉटेल मालकाने लागलीच पोलिस निरिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिस निरिक्षकांनी आपण दारू पित नसल्याने दारू मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदर हॉटेल मालक योगेश जाधव यांनी घडलेला प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर संबंधित हॉटेल व्यावसायिकाने हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकांºयांच्या कानावर घातला. अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडून हे प्रकरण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याकडे पोहोचले. या प्रकरणाची चित्रफित पाठविण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी अंती जिल्हा पोलिस अधिक्षकांनी अनिता इर्शीद यांना तात्काळ निलंबित केले. पोलिस निरिक्षकांसाठी दारू मागताना महिला पोलिस निलंबित झाल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दामिनी पथकातही चर्चेत!
महिला पोहेकॉ अनिता इर्शीद दामिनी पथकात असताना चांगल्याच चर्चेत सापडल्या होत्या. काही जोडप्यांना विनाकारण त्रास दिल्याचा ठपका त्यांच्यावर त्यावेळी ठेवण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका सापळ्यातूनही त्या काही दिवसांपूर्वी थोडक्यात बचावल्या होत्या. आता पोलिस निरिक्षकांच्या नावे दारू मागितल्याच्या प्रकरणामुळे त्यांची उपरोक्त प्रकरणेही चर्चेत सापडल्याचे एका पोलिस कर्मचाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.