शिक्षकांना फ्रन्ट लाईन वर्करच्या सुविधा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:13+5:302021-05-19T04:36:13+5:30
बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत कोविड १९ च्या कर्तव्यावर नेमणुका देण्यात ...
बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना गावपातळी ते जिल्हा पातळीपर्यंत कोविड १९ च्या कर्तव्यावर नेमणुका देण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने शिक्षकांच्या सेवा काेविड-१९ अंतर्गत आपत्कालीन परिस्थिती म्हणून अधिग्रहीत केलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षकसुद्धा आपले योगदान या राष्ट्रीय आपत्तीसाठी देत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १५ ते २० शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून अनेकांच्या कुटुंबांतील व्यक्तीसुद्धा या आजाराने मृत्यू पावल्या आहेत. कोरोना जिल्हाभरात गाव पातळीपर्यंत वाढत असल्यामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. शिक्षकांच्या नेमणुका ह्या गावपातळीवर कुटुंब सर्वेक्षण, शहरातील बाजाराच्या ठिकाणी, जिल्हा, तालुका सीमेवर अंतर्गत चेकपोस्ट अशा ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षक हे दिलेले काम प्रामाणिकपणे व योग्यरितीने बजावत आहेत, परंतु तालुका, गावपातळीवर नेमणुका देताना त्रुटी व समस्या आढळतात, याची दखल घेऊन त्रुटींचे निवारण करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.