अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बियाणे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:33+5:302021-06-16T04:46:33+5:30
गतवर्षी बोगस बियाणे निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करूनसुद्धा अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई भासत असल्यामुळे ...
गतवर्षी बोगस बियाणे निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करूनसुद्धा अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजले होते. त्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई भासत असल्यामुळे चढ्या भावात बियाण्यांची विक्री होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शेतकऱ्यांना बियाणे अनुदानावर मिळवण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. परंतु मोजक्याच शेतकऱ्यांना बियाणे मिळाले असून अनेक शेतकरी बियाण्यांपासून वंचित आहेत. शासनाने सरसकट बियाणे देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करीत आहेत. गतवर्षी बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने राज्य सरकारने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली होती. परंतु मोजक्याच गावात ही मदत मिळाली. बाकीच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मदतीपासून वंचित आहेत. पीक विमा भरूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफीपासून बरेच शेतकरी वंचित आहेत. कोरोना महामारीचे कारण समोर करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
आंदोलनाचा इशारा
ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रति अर्ज १०० रुपये द्यावे लागले. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळवण्याकरिता अर्ज केले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळालेच नाही. सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर तत्काळ बियाणे देण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.