पाेकरा याेजनेविषयी जनजागृती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:42 AM2021-07-07T04:42:44+5:302021-07-07T04:42:44+5:30
राहेरी बु. : शेतकऱ्यांना शेती व्यवसायासोबत शेतीपूरक जोड व्यवसाय करता यावा यासाठी प्रोजेक्ट ऑन क्लायमेट ओरिजिनल एग्रीकल्चर ...
राहेरी बु. : शेतकऱ्यांना शेती व्यवसायासोबत शेतीपूरक जोड व्यवसाय करता यावा यासाठी प्रोजेक्ट ऑन क्लायमेट ओरिजिनल एग्रीकल्चर प्रकल्प (पोकरा) अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही योजना राबविली जात आहे. या याेजनेची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसल्याने त्यांना याेजनेचा लाभ घेता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या याेजनेची जनजागृती करण्याची गरज आहे़
या योजनेंतर्गत फळबाग लागवड, शेततळे, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन, वीज पंप, पाइप लाइन, कृषी यांत्रिकीकर, ट्रॅक्टर यासह अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्याला मिळवता येतो. कृषीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जात असलेल्या या योजनेत सिंदखेड राजा तालुक्यामधील अनेक गावांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेविषयी पूर्णपणे माहिती नसल्याचे दिसून येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाही़
पोकरा योजना राबवण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून दिली आहे ते अधिकारी तसेच गाव पातळीवर निवडलेली समिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोकरा योजनेविषयीची माहिती पुरवत नसल्याचे चित्र आहे. या याेजनेचा लाभ काही माेजक्याच शेतकऱ्यांना हाेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या याेजनेविषयी राहेरी परिसरात जनजागृती करण्याची गरज आहे़
पोकरा योजनेचे अर्ज ऑनलाइन करण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे ती वेळेवर येत नाही़ त्यामुळे ऑनलाइनची कामे दुसऱ्या व्यक्तीकडून करावी लागत असून ते जास्त दराने पैसे घेत आहेत.
-तुकाराम देशमुख, शेतकरी, राहेरी बु.