देशी दारू दुकान हटवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:35 PM2017-10-29T23:35:57+5:302017-10-29T23:36:30+5:30
मोताळा : मोताळा शहरातील प्रभाग- ३ मध्ये असलेले देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोताळा तहसीलदार व बोराखेडी ठाणेदार यांना २६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : मोताळा शहरातील प्रभाग- ३ मध्ये असलेले देशी दारूचे दुकान हटवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोताळा तहसीलदार व बोराखेडी ठाणेदार यांना २६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे, की मोताळा शहरातील प्रभाग-३ मधील देशी दारूचे दुकान हे राहत्या लोकवस्तीमध्ये असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिण्यासाठी येणारे लोक महिलांना व ये-जा करणार्या शाळकरी मुला- मुलींना अश्लील भाषेचा वापर करून अरेरावी करतात.
लगतच असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या दुकानावर जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने वस्तीमधील रहिवाशांनासुद्धा याच रस् त्याचा वापर करावा लागत असल्याने दारू पिऊन येणार्या लोकांचा महिला व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्री महिलांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे.
येथील दारूचे दुकान हटवण्यासाठी याआधीही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. १३ नोव्हेंबरपर्यंत दुकान हटविण्यात आले नाही, तर संपूर्ण कुटुंबासह दारू दुकानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.