दारूविक्री बंद करण्याची मागणी करणाऱ्याकडेच सापडला दारू साठा!
By Admin | Published: July 10, 2017 12:58 AM2017-07-10T00:58:31+5:302017-07-10T00:58:31+5:30
पोलिसांची धडक कारवाई : शिवसेना नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा: शहरातील अवैध धंदे त्यातही प्रामुख्याने अवैधरीत्या वाढलेली देशी-विदेशी दारू विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी निवेदनातून स्थानिक पोलीस प्रशासनाला दिला; मात्र ठाणेदार सारंग नवलकर यांनी यासंदर्भात दखल घेऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत निवेदन देणारे शिवसेना नगरसेवक अजय शिवरकरसह एका विक्रेत्याकडे अवैध दारूचा साठा मिळून आल्याचा प्रकार घडला.
दारूची अवैधरीत्या विक्रीही गुप्तपणे मोठ्या प्रमाणात देऊळगावराजा शहरात वाढली. यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, न.प. उपाध्यक्ष पवन झोरे, नगरसेवक विजय देवउपाध्ये, वसंताआप्पा खुळे, मोरेश्वर मिनासे, शिवाजी कुहीरे, राजू नागरे, मोहन खांडेभराड, नगरसेवक नंदन खेडेकर, नगरसेवक अजय शिवरकर, नगरसेविका रेखा बोरकर, नंदा कटारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाणेदार नवलकर यांना निवेदन देऊन अवैध दारूविक्री तत्काळ बंद करावी अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. दरम्यान, ठाणेदार नवलकर यांनी सदर निवेदनाची दखल घेत तपास सुरू केला. पीएसआय अकील काझी, पीएसआय गौरव सराग, हेड कॉ. सर्जेराव तौर, जगदीश वाघ, पो.कॉ. संजय घिके, भराड, जाधव व कर्मचारी सज्ज झाले. अवैधरीत्या जमवलेला दारूचा साठ्याची माहिती पोलिसांकडे होती. जालना रोडवर असलेल्या बारजवळ पोलिसांचा ताफा आला. कुलूप तोडले असता आतमध्ये ६७२ देशी दारूच्या बाटल्या व तो माल चक्क नगरसेवक अजय शिवरकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. बाजूच्या गल्लीत दुसऱ्या पथकाने छापा टाकला असता भाऊराव खुपसे यांच्या घराजवळून ९६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. देऊळगावराजा पोलिसांनी अवैधरीत्या दारूसाठा व विक्रीप्रकरणी शिवसेना नगरसेवक अजय अंबादास शिवरकर, भाऊराव नारायण खुपसे यांच्याविरुद्ध पीएसआय गौरव सरागे, हे.कॉ. सर्जेराव तौर यांच्या फिर्यादीवरून मुंबई दारूबंदी कायद्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन १९८/१७, १९९/१७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेची झाली फसगत
एका चांगल्या उदात्त हेतूने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर, नगरसेवक नंदन खेडेकर, नगरसेविका रेखा बोरकर, नंदा कटारे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ठाणेदार नवलकरांना निवेदन दिले. शिवसेनेचे नगरसेवक अजय शिवरकरसुद्धा तिथे हजर होते. पोलिसांनी तातडीची पाऊले उचलून धाडी टाकल्या आणि त्या धाडीत ६७२ देशी दारूच्या बाटल्या सापडल्याने निवेदन देताना हजर असणारे नगरसेवक अजय शिवरकर यांच्यावर पुढच्या दोन तासानंतर पो.स्टे.ला आरोपी म्हणून हजर होण्याची वेळ आल्याने शिवसेनेची यात मोठी फसगत झाली. या प्रकारामुळे शहरभर चर्चेचे पेव फुटले आहे.