लघु प्रकल्प रस्त्यावरील भूमाफियांच्या अतिक्रमणाविरोधात तहसील कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 12:59 PM2023-12-19T12:59:32+5:302023-12-19T13:06:22+5:30
धरणावर जाण्याकरीता गावकऱ्यांना विहिरीवर जाण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते.
लघु प्रकल्पाच्या रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमण तात्काळ हटवून 16 गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर जाण्या- येण्याचा रोड रस्ता तात्काळ मोकळा करुन द्यावा या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीने खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लांजुड गावाची कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची विहिर लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असून विहिरीवरील पाणीपुरवठ्याच्या मोटारी चालू-बंद करण्याकरीता जाणे-येणेसाठी रस्ता असून सुध्दा तो रस्ता अवैधरित्या काही भूमाफीयांनी अडविल्यामुळे तेथे जाणे-येणे करता येत नाही, पावसाळ्यात धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहते. धरणावर जाण्याकरीता गावकऱ्यांना विहिरीवर जाण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. वेळ प्रसंगी पिण्याच्या पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित रहावे लागते.
लांजुड परिसरातील शासकीय रस्ता 1995 मध्ये जिल्हाधिकारी संपादित केला होता, त्या खामगाव येथील काही भूमाफियांनी रस्ता अडवून त्यावर तार कंम्पाऊंड करून अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच हायवे लगत असलेल्या सिलिंग गट नं.62/1 या महाराष्ट्र शासनाच्या सिलिंग जमिनीवर सुध्दा तार कम्पाऊंड करुन बेकायदेशीर कब्जा करुन अतिक्रमण केलेले आहे. तात्काळ कारवाई करुन अतिक्रमण कैलेला रस्ता मोकळा करुन द्यावा व या प्रकरणाची विशेष पथक नेमून व सखोल चौकशी करुन चौकशी अंती फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास गावकरी स्वतः अतिक्रमण काढतील असा इशारा देण्यात आला आहे.