डेंग्यूचे ११ संशयित रुग्ण आढळले!
By admin | Published: September 26, 2016 02:46 AM2016-09-26T02:46:35+5:302016-09-26T02:46:35+5:30
वातावरणाचा परिणामामुळे व्हायरलचा प्रकोपही वाढला!
हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. २५- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी-जास्त येणारा पाऊस व दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे 'व्हायरल'च्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळत असून, ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून व्हायरलचा प्रकोप वाढला असून, या महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे.
खासगी हॉस्पिटलसह जिल्हा सामान्य रुग्णालयात खोकला, ताप आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मागील वर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळले नव्हते. यावर्षी मागील सहा महिन्यात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून २ लाख १0 हजार ७९४ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यात मलेरियाचे १६ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. सध्या डेंग्यूचे ११ संशयित रुग्ण आढळले असून, ते विविध खासगी तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे परिसरात डेंग्यूविषयी नागरिकांमध्ये भीती कायम आहे.
वातावरण विषाणूंसाठी पोषक
ऋतू बदलल्याने सर्दी-खोकला व घशाचा संसर्गाने डोके वर काढले आहे. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. विशेषत: पावसाच्या उघडझापमुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या शिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने कीटकजन्य आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत.