डेंग्यूचा प्रकोप: खामगावात धुर फवारणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:43 PM2018-08-04T13:43:01+5:302018-08-04T13:44:35+5:30
खामगाव: डेंग्यू आजाराच्या प्रकोपाची गांभीर्यता लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने धुळ फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छतेवरही भर दिल्या जात असल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: डेंग्यू आजाराच्या प्रकोपाची गांभीर्यता लक्षात घेता, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने धुळ फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छतेवरही भर दिल्या जात असल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातील वामन नगर आणि समता कॉलनी भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर शहरात धुरळणी करण्यात यावी, यासाठी सामान्य रूग्णालय प्रशासनाकडून पालिका प्रशासनाला पत्र देण्यात आले. त्यानंतर पालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवारपासून शहरात धूळ फवारणी केली जात आहे. डेंग्यू आजाराचे रूग्ण आढळून आलेल्या भागात प्रामुख्याने धुरळीस प्राधान्य दिल्या जात असल्याची माहिती नगर पालिका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. सोबतच शहराच्या विविध भागात स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिल्या जात असल्याचे नगर पालिकेचे आरोग्य अंभियंता नीरज नाफडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आरोग्य विभागाकडूनही सर्वेक्षण!
शहरातील चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे गेल्याच आठवड्यात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून शहरातील घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रकोपग्रस्त भागातील रक्त नमुनेही गोळा केल्या जात असून, पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. डेंग्यू आजाराच्या प्रकोपापासून बचावासाठी आरोग्य आणि पालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतल्या जात असल्याचे दिसून येते.