डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
By admin | Published: October 30, 2014 11:59 PM2014-10-30T23:59:24+5:302014-10-30T23:59:24+5:30
बुलडाणा जिल्ह्यात २५ दिवसात १0 मृत्यू : आरोग्य प्रशासनाचे तापावर नियंत्रण नाही.
बुलडाणा : वातावरणात होणार्या बदलामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यूसदृ्श तापाचे बरेच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. बुलडाणा शहरासह तालुक्यातील कोलवड, धाड, लोणार, मेहकर तालुक्यातील नागझरी, डोणगाव, देऊळगावराजा, चिखली येथे डेंग्यू सदृश तापाने गेल्या पंचविस दिवसात १0 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र डेंग्यूच्या भीतीचे वातावरण आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाला मात्र अद्यापही डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. गेल्या आठवड्याभरापासून वातावरण मोठा बदल झाला आहे. दुपारी कडक उन्ह असते, तर रात्री थंडी पडत असते. त्यात अस्वच्छतेची भर आहे. शहरांशिवाय ग्रामीण भागात सर्वत्र घाण साचत आहे. यामुळे डासांची संख्या वाढून मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारखे आजार शहरात तोंड वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागातील हिवताप विभागाकडून डेंग्यू संशयीत काही रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविले आहे. तर काही खासगी रुग्णालयात रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जिल्ह्यात तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आलेली नाही
. *आरोग्य मोहीम कागदावरच
डेग्यूसदृश तापाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बुलडाणा, लोणार, मेहकर तालुक्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने शहर आणि ग्राम स्तरावर स्वच्छता मोहीम तसेच शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जनजागृती मोहीम हाती घेतली; मात्र ही मोहीम आता कागदावरच राहिली आहे. सध्या अशी मोहीम तातडीने राबविण्याची गरज आहे.