बुलडाणा जिल्ह्यात डेंग्यू पसारताेय पाय; यंत्रणा अलर्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 11:09 AM2021-08-21T11:09:59+5:302021-08-21T11:10:05+5:30
Dengue spreading in Buldana district : जानेवारी ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळले, तर १४७ रुग्ण हे संशयित आहेत.
- भगवान वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याची स्थिती असून, चिखली तालुक्यात डेंग्यूचे सात रुग्ण आहेत, तर संपूर्ण जिल्हाभर तब्बल १४७ डेंग्यूचे संशयित रुग्ण असून, हिवतापाचे मात्र दोनच रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती आहे.
शहरासह जिल्ह्यात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढत चालला आहे. जानेवारी ते ८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे सात रुग्ण आढळले, तर १४७ रुग्ण हे संशयित आहेत. एकट्या चिखली तालुक्यातील अमडापूरमध्ये सात रुग्ण आढळल्याने तिथे उद्रेक जाहीर करण्यात आला होता. मात्र, आवश्यक त्या उपाययोजना करून डेंग्यूचा वाढता प्रकोप रोखण्यास जिल्हा हिवताप कार्यालयाला यश आले आहे.
शहरात डासांची तीव्रता कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात अद्यापही डेंग्यूच्या डासांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून डेंग्यूने जिल्ह्यातील नागरिक त्रस्त असतानाच चालू वर्षात पावसाळ्यातच डेंग्यूचा प्रभाव वाढला आहे. सध्या पारेशन कालखंड सुरू असून, यादरम्यान जिल्ह्यात हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणत्या डासांमुळे होतो डेंग्यू?
डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे, एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. एका संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर व्यक्तीला हा आजार होतो.
फक्त चिखली तालुक्यातच आढळले डेंग्यूचे रुग्ण
जिल्ह्यातील केवळ चिखली तालुक्यातील अमडापूरमध्येच डेंग्यूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. एकावेळी एवढे रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा हिवताप कार्यालयाने उद्रेक जाहीर केला होता. या रुग्णांवर योग्य ते उपचार करून हा उद्रेक रोखण्यात आला आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जरी आढळले असले, तरी आता जिल्ह्यात डेंग्यू नियंत्रणात आहे. १४७ रुग्ण संशयित असून, त्यांच्या निश्चितीकरणाचे अहवाल प्राप्त होताच, त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करून डेंग्यू नियंत्रणात आणण्यात येईल.
-एस.बी. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा