डेंग्यू; सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:05 PM2020-09-26T12:05:20+5:302020-09-26T12:05:28+5:30
आरोग्य प्रशासनाकडून खामगाव शहरातील सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत असतानाच डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाकडून खामगाव शहरातील सहा हजारावर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सुमारे दीड हजार घरांना भेटी देण्यात आल्या.
गत पंधरवाड्यात खामगाव शहरात डेंग्यूचे १३ पेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. कोरोना विषाणू संक्रमण कालावधीतच डेंग्यू आणि इतर साथरोगाचे संकट घोंगावू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. खामगाव शहराच्या विविध भागात आढळून आलेल्या रूग्णांच्या परिसरातील सहा हजार १७५ जणांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. कोविड-१९ च्या अनुषंगाने यावेळी आवश्यक त्या उपाययोजनाही आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या. दरम्यान, कोरोना कालावधीतच सर्दी, ताप, खोकला या आजाराची रूग्णसंख्या वाढीस लागली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून वातावरणातील बदलामुळेही विविध व्हायरल आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. यातच शहरातील विविध प्रभागात असलेले घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी युक्त परिसरामुळे डेंग्यू आणि मलेरीयासारखे आजार डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक बी.बी.बढे, आशा वर्कर आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले.
पाच पथकांकडून सर्वेक्षण!
डेंग्यू सोबतच साथरोग नियंत्रणासाठी खामगाव शहरात पाच पथकांकडून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आशा वर्कर, आरोग्य सेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ७ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गृहभेटी देण्यात आल्या. यावेळी १२४ दूषित घरे शोधण्यात आली. यामध्ये ४१३० भांड्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३६५ दूषीत भांडी आढळली असून २८८ भांडी खाली करण्यात आली. तर ७७ भांड्यांमध्ये टेमिफास्ट द्रावण टाकण्यात आले.