सूक्ष्म सिंचन योजनेची थकबाकी नाकारली
By admin | Published: March 11, 2016 02:54 AM2016-03-11T02:54:16+5:302016-03-11T02:54:16+5:30
सरकार म्हणते परवानगी घेतली नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली चर्चेची मागणी.
बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्याचे देय असलेले ४३ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, उर्वरित शेतकर्यांनी कृषी विभागाची पूर्वसंमती घेतली नसून, व्यक्तिगत पातळीवर सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था बसवून घेतल्याने त्यांना अनुदान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी धक्कादायक भूमिका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात शासनाने घेतल्याने, या प्रकरणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, विधानसभेत अर्धा-तास चर्चेची मागणी गुरुवारी विधानसभेत रेटून धरली आहे.
विदर्भातील शेतकर्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा, याकरिता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम शासनाने सुरू केलेला आहे. सदर योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार १७६ शेतकर्यांनी लाभ घेतला होता. मात्र, त्यापोटी मिळणारे ८७ कोटी ८१ लाख अनुदान अद्यापही शेतकर्यांना वितरित करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. संतोष टारपे यांनी संयुक्तपणे तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्नाच्या लेखी उत्तरात कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हा धक्कादायक खुलास केला आहे.