‘श्रीं’च्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान
By Admin | Published: May 31, 2017 12:45 AM2017-05-31T00:45:46+5:302017-05-31T00:45:46+5:30
५० वे वर्ष : हजारो भाविकांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : अवधीच तीर्थ घडली एक वेळा। चंद्रभागा डोळा देखिलीया।।
अवधीच पापे गेली दिगंतरी। वैकुंठ पंढरी देखिलीया।।
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक। विठ्ठलची एक देखिलीया।।
‘श्रीं’च्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ज्येष्ठ शु.६ दि. ३१ मे रोजी श्रींच्या मंदिरातून विधिवत पूजन व्यवस्थापकीय विश्वस्त भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते सकाळी ७ वा. मंदिरातून प्रस्थान होत आहे. श्रींच्या पालखीचे हे ५० वे वर्ष असून, संतनगरीतून स्वागत व पूजन स्वीकारत ही पालखी नागझरीकडे मार्गस्थ होणार आहे. यामध्ये पारसला मुकाम तर १ जून रोजी गायगाव-भौरद, २ आणि ३ जून अकोला मुक्कामी राहणार असून, ४ जून रोजी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. संत गजानन महाराज संस्थानकडून श्रींच्या पालखीची तयारी झाली आहे. या पालखीमध्ये हजारो भाविक भक्त सहभागी होणार आहे. दरवर्षी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात पालखी सोहळा पार पडत असून, यादरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होते. तसेच ठिकठिकाणी भाविक पालखीचे घरासमोर अंगणात रांगोळी काढून स्वागत करतात. पालखीदरम्यान भाविकांसाठी गावा-गावांत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले.