समग्र शिक्षा अंतर्गत कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:39+5:302021-08-18T04:41:39+5:30
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद बुलडाणा येथे साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण विशेष तज्ञ व विशेष शिक्षक या पदावर कार्यरत ...
समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद बुलडाणा येथे साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण विशेष तज्ञ व विशेष शिक्षक या पदावर कार्यरत असून नियुक्त्या ह्या कंत्राटी पध्दतीने असतात. समग्र शिक्षा अंतर्गत या पदाचा सेवा आदेश ३० मे रोजी संपुष्टात आले आहेत. एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन नवनियुक्ती आदेश २ जूनपासून देणे अपेक्षित होते. मात्र अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना आदेश प्राप्त न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जूनपासून अद्यापपर्यंत मानधनसुध्दा अदा होऊ शकले नाही. कोविड -१९ कालावधीत काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू सुध्दा झालेला आहे. काही कर्मचारी कोविड -१९ बाधित होते. त्यांना उपचारासाठी बराच खर्च झालेला आहे. यामध्ये काही कर्मचारी हे बाहेरगावचे असल्यामुळे त्यांचे घरभाडे, मुलांचे शिक्षण व पोटापाण्याचा खर्च भागविणे अवघड झालेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खालावत आहे. त्यामुळे नवनियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर उद्धव चव्हाण, गजानन शेळके, राम निकाळजे, के. पी. गोसावी, डी. एम. रबडे, अमोल पाटील, सुनील शेजुळ, अनुराधा जाधव, के. एन. इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.