उप जिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण
By admin | Published: July 4, 2017 12:14 AM2017-07-04T00:14:26+5:302017-07-04T00:14:26+5:30
मलकापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे जणुकाही ग्रहणच लागले आहे. त्यांचा भरणा बऱ्याच दिवसांपासून नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे जणुकाही ग्रहणच लागले आहे. त्यांचा भरणा बऱ्याच दिवसांपासून नाही. परिणामी आरोग्य सेवा विस्कळीत होऊन दिवसाकाठी येणारे शेकडो रुग्ण वाऱ्यावर पडण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, मलकापूर व परिसरातील हजारो नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून शासनाच्यावतीने येथे सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी केली. मात्र, उपजिल्हा रुग्णालय सतत या ना त्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत आहे.
विद्यमान परिस्थितीत रिक्त पदांचा भरणा गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात आला नसल्याने, उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलेय. या संदर्भात माहिती घेतली असता वर्तमान स्थितीत सहायक अधीक्षक १, वरिष्ठ लिपिक १, कनिष्ठ लिपिक १, औषधी निर्माण अधिकारी २, स्टाफ नर्स ३ व वैद्यकीय अधिकारी ३ अशी पदे कित्येक दिवसांपासून रिक्त असल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाचा विषय असा, की वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८ पैकी ५ पदे भरण्यात आली असली, तरी त्यात प्रत्यक्ष सहभागी किती जणांचा राहतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एकीकडे कार्यालयीन कामकाजावर रिक्त पदाचा परिणाम होत असून, दुसरीकडे त्यामुळे आरोग्य सेवाही प्रभावित झाल्याचे दिसत आहे.
रिक्त पदांमुळे निश्चित आरोग्य सेवा व कार्यालयीन कामकाज प्रभावित झाले आहे. त्याकरिता पाठपुरावा केला आहे. त्यावर कारवाईची प्रतीक्षा आम्हाला आहे.
- डॉ. अमोल नाफडे
वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर