दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार ढेपाळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 11:35 AM2021-08-12T11:35:37+5:302021-08-12T11:35:46+5:30
Khamgaon News : रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही दुसरे दुय्यम निबंधक रुजू झालेले नाहीत.
खामगाव : येथील वादग्रस्त दुय्यम निबंधक अनिल पवार(श्रेणी-१) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अद्यापही दुसरे दुय्यम निबंधक रुजू झालेले नाहीत. परिणामी, उपदुय्यम निबंधक (श्रेणी-२) कार्यालयावरील ताण वाढला असून, अनेक खेरदी रखडल्याने शेतकरी आणि सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात जास्त खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे खामगाव येथे श्रेणी-१ आणि श्रेणी-२ दुय्यम निबंधक कार्यालये कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, कधी कनेक्टिव्हिटी नसल्याने, तर कधी दुय्यम निबंधकांच्या गलथान कारभारामुळे खामगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालये नेहमीच चर्चेत असतात. , शासकीय जमिनीचे मूल्य कमी करून, खरेदी नोंदणी प्रकरणात अडचणीत सापडलेल्या दुय्यम निबंधक अनिल पवार यांनी विनंतीवरून मेहकर येथे बदली करून घेतली आहे. पवार यांच्या बदलीनंतर दुय्यम निबंधक कार्यालय येथील कामकाज ठप्प झाले आहे.
शंभरावर खरेदी नोंदणी रखडल्या!
तांत्रिक अडचण आणि दुय्यम निबंधकांच्या नियुक्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी विक्रीचे व्यवहार होणाऱ्या खामगाव शहरातील शंभरावर व्यवहारांची खरेदी नोंद रखडल्याची चर्चा आहे.
श्रेणी-२ दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताण वाढला!
दुय्यम निबंधक नसल्याचा फटका शेतकरी आणि खरेदी खत नोंदणी करणाऱ्यांना बसत आहे.
श्रेणी-२ उपदुय्यम निबंधक कार्यालयावरील ताण वाढल्यामुळे शेतकरी आणि बाहेरगावच्या नागरिकांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागतेय.