तत्कालीन मुख्याधिकारी देशमुख यांना जामीन
By admin | Published: May 31, 2017 12:59 AM2017-05-31T00:59:46+5:302017-05-31T00:59:46+5:30
खामगाव : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगळवारी येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मंगळवारी येथील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला.
शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारबाबत २३ मे रोजी नगर परिषदेचे नगर अभियंता निरंजन जोशी यांनी मुख्याधिकारी यांच्यावतीने व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, शिवाजी नगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा तसेच माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी गुन्हे दाखल होण्यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
तसेच गुन्हे दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांनी अंतरिम अटकपूर्व जामीनसाठी २४ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता त्यांनाही अटकपूर्व जामीन मिळालेला आहे, तर २५ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता गोकुलचंद सानंदा, माजी.आ.दिलीपकुमार सानंदा, दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २ जून रोजी न्यायालयाने ठेवली आहे. दरम्यान २३ मे रोजी माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा व सरस्वती खासणे यांनीही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता, तर मंगळवारी या प्रकरणातील आरोपी तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला असता त्यांनासुद्धा तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला असून, या अर्जावरही २ जून रोजीच सुनावणी होणार आहे.