‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत उदासिनता : सात महिन्यात मेहकर तालुक्यात एकही अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:36 PM2018-02-10T13:36:57+5:302018-02-10T13:40:45+5:30
मेहकर : तालुक्यात गेल्या सात महिन्यात या योजनेबाबत एकही अर्ज संबधीत कार्यालयाला प्राप्त झाला नसल्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे.
- उद्धव फंगाळ
मेहकर : मुलींचा जन्मदर दिवसें-दिवस कमी होत आहे. स्त्रीभृण हत्या वाढत आहेत. मुलींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी, मुलगी जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरु केली आहे. तालुक्यात गेल्या सात महिन्यात या योजनेबाबत एकही अर्ज संबधीत कार्यालयाला प्राप्त झाला नसल्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे. स्त्रीभृण हत्या वाढल्याने मुलींचा जन्मदर झाला आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, मुलींसदर्भात समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सदर उपक्रम शासनाच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहेत. याचबरोबर अनेक सामाजीक संघटना, सामाजीक चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, महिला मंडळ, बेटी बचाओ संदर्भात जनजागृती करीत आहेत. ज्या कु टुंबामध्ये एक किंवा दोन मुली असतील त्या कुटुंबाला मुलींचे शिक्षण, विवाह यासाठी सुध्दा शासनाने आर्थीक तरतुद करुन ठेवली आहे. १ आॅगस्ट २०१७ पासुन शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत १ आॅगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे ५० हजार रुपये राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात येतात. तर सदर मुलगी सहा वर्ष, १२ वर्ष व १८ वर्ष झाल्यानंतर टप्याटप्याने त्या मुलीला या योजनेचा आर्थीक लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा मेहकर तालुक्यात प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी स्थानीक बालविकास कार्यालयाचे अधिकारी डिगांबर खटावकर, आर.के.सपकाळ, रविंद्र बोरे, अरुण गायकवाड, पर्यवेक्षीका विद्या नव्हाळे, उषा इंगळे, सिमा पवार, अंजली देशमुख, विधाता कवटकर, योगीता घंटे, विद्या चव्हाण, जमुना हिवरकर, गजानन धोंडगे यांनी मेहकर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला भेटी देऊन बैठका घेऊन माहीती सांगीतली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन या योजनेसंदर्भात जनजागृती केली. परंतु गेल्या सात महिन्याच्या कालावधीत या योजनेबाबत नियमाप्रमाणे एकही अर्ज संबधीत विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून ेयेत आहे.