‘डेडलाईन’ संपूनही बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाची कामे अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:28 PM2019-08-20T14:28:26+5:302019-08-20T14:28:35+5:30
मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या सात ठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत. यापैकी चार ठिकाणच्या कामांची मुदत जून २०१९ मध्येच संपलेली आहे. परंतु अद्यापही कामे पूर्ण झालेली नाहीत. डेडलाईन संपूनही महामार्गाची कामे अर्धवटच राहिल्याने विकासाच्या वाटेत अडचणी निर्माण होत असून दळणवळणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन टप्प्यात महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जून २०१७ मध्ये चार ठिकाणी ही कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये मेहकर-चिखली ३९.७ किमी, चिखली-खामगाव ५६.१० किमी, खामगाव-शेगाव २२.८ किमी व अजिंठा-बुलडाणा ४९.१३ किमी तर दुसऱ्या टप्प्यात जून २०१८ मध्ये चिखली-टाकरखेड ३९.६० किमी, टाकरखेड-जालना ४०.२६ किमी, नांदुरा-जळगाव जामोद २५ किमी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला. यापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची मुदत जून २०१९ मध्येच संपली आहे. मात्र मुदत संपून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ही कामे रखडलेली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताच्या घटनाही यामुळे घडल्या असून यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे.
तर दुसºया टप्प्यात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम देखील थंडावले असल्याचे चित्र आहे. यामुळे सबंधित रस्त्यावरून ये-जा करणाºया वाहनधारकांसह सर्व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नांदुरा-जळगाव जामोद या मार्गावर तर खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला चिखल झाल्यामुळे वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला.
काम मुदतीत पूर्ण न होण्याची कारणे
महामार्गाचे काम सिमेंट काँक्रीटीकरणाचे असल्याने या कामाला पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते. मात्र कामादरम्यान पाण्याची तूट जाणवल्याने अनेकवेळा काम बंद ठेवण्याची वेळ ओढवली. झाडांची कत्तल व जंगल परिसरातून जाणाºया रस्ता कामासाठी वन विभाग तर विद्युत खांब स्थलांतरणासाठी महावितरणकडून परवाना उशीरा मिळाल्याने अनेक ठिकाणी कामे विलंबाने झाली. इतरही अडचणी आल्याने महामार्गाचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य झाले नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांचे काम जवळपास ७० टक्क्यांपेक्षा जास्त तर दुसºया टप्प्यातील रस्त्यांचे काम ५० टक्के पूर्णत्वास गेले आहे. सर्व रस्त्यांची कामे वेगाने करण्यावर भर देण्यात येत आहे. वाहनधारकांना सध्या त्रास होत असला तरी येणाºया काळात या रस्त्याने त्यांनाच प्रवास करणे सुकर होईल.
- के. बी. दंडगव्हाळ,
उप अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, खामगाव.