मर्यादीत साधनसामग्रीत शेती विकसित करा !
By Admin | Published: February 4, 2016 01:21 AM2016-02-04T01:21:41+5:302016-02-04T01:21:41+5:30
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांचे प्रतिपादन.
शिरपूरजैन (जि. वाशिम): शिक्षण केवळ अभ्यासापुरते र्मयादीत न ठेवता आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करुन र्मयादीत साधनसामग्रीत योग्य शेती कशी करता येईल, याकडेही विद्यार्थ्यांंनी लक्ष द्यायला हवे, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोडद्वारा संचालित स्थानिक स्व. पुंडलिक गवळी कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे शिरपूर येथे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मोहन खेडेकर व खासदार भावना गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी प्रबोधन कार्यशाळा ३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन खासदार गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरु डॉ. खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, ङ्म्रीकांत पाटील, शिरपूरच्या सरपंच इंदु इरतकर यांची उपस्थिती होती. खासदार गवळी यांनी शेतकर्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दुसर्यावर जास्त अवलंबून न राहता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन योग्य पद्धतीने शेती करून उत्पादन वाढवावे, यामुळे शेतकर्यांना आत्महत्या करण्याची गरज भासणार नाही, असे म्हटले.
याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष शिंदे, विश्वासराव बोरकर, दत्ता लोनसुने, देवराव गायकवाड, नंदकिशोर उल्हामाले, संजय कान्हेड, यादव ढवळे यांनी यशोगाथा मांडल्या. पशुविज्ञान व दुग्धतंत्रज्ञान विभागाचे डॉ.नितीन चोरे व अमोल भोंग यांनीही उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला शिरपूर, वसारी, दुधाळा करंजी, मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा यासह मालेगाव तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.