मोताळय़ाचा विकास रखडला
By admin | Published: December 31, 2014 12:25 AM2014-12-31T00:25:13+5:302014-12-31T00:25:13+5:30
कायमस्वरुपी पद भरण्याची मागणी.
मोताळा (बुलडाणा): गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला असला तरी तालुका असलेले मात्र नगरपालिका नसलेले एकमेव गाव आहे. येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फतच चालविल्या जातो, त्यामुळे मोताळय़ाच्या विकासाची सारी भिस्त ही ग्रामपंचायतीवरच आहे; मात्र एवढय़ा मोठय़ा ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी लागणारा ग्राम सचिव नाही. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त असल्यामुळे अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत.
या तालुक्याच्या विकासाचे चित्र हे इतर १२ तालुक्याच्या दृष्टीने खेड्यातच जमा असल्याने मोताळय़ाच्या विकासासाठी शासन कधी पुढाकार घेणार, हा प्रश्नच आहे. मागासलेला तालुका म्हणून ठपका बसलेल्या मोताळा या शहराला गाव म्हटले तरी अनेक अडचणी समोर येतात. गावाच्या विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते; मात्र अनेक दृष्टीने विकासाची कामे अडली आहेत. येथील बाजार हर्रासी जाहीर स्वरूपात प्रतिवर्षी केली जात नाही.
मागील तीन वर्षांची सरासरी काढून हर्रासी दिल्या जाते, त्यामुळे ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान होते. हीच बाजार हर्रासी प्रतिवर्षी केल्या गेली तर ग्रा.पं.ला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. वसुलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. बाजारातील वाढत्या अतिक्रमणाला ग्रामपंचायत प्रतिबंद घालू शकत नाही. नाल्याची साफसफाई वेळेवर केल्या जात नाही. स्मशानभूमीची देखरेख व दुरूस्तीची कामेसुद्धा ग्रामपंचायतीकडून केल्या जात नाही. मोताळय़ातील बाजार हा जिल्हय़ातील सर्वात मोठा बाजार; परंतु येथे बैठक व्यवस्थेचे नियोजन नाही. गावामध्ये शासनाच्या ज्या विविध योजना जसे तंटामुक्ती, हगणदरीमुक्त गाव, ग्राम स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन योजना तसेच मनरेगाच्या कामात कोणतीही प्रगती दिसून येत नाही. अतिरिक्त आवकअभावी या गावाचा विकास खुंटला आहे.