कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:21 AM2020-05-08T10:21:11+5:302020-05-08T10:21:19+5:30

समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे (स्कील लेबर) लोंढे स्वगृही परतत आहे.

Development work hampered by labor migration | कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत

कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत

Next

- नीलेश जोशी

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर जिगाव प्रकल्पासह समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे (स्कील लेबर) लोंढे स्वगृही परतत आहे. परिणामी जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकास कामांची गती मंदावली आहे.

समृद्धी महामार्गावरील वाहनांचे टायर खराब झाल्याने साडेचारशे वाहनांपैकी ९० वाहने बंद अवस्थेत असल्याने या प्रकल्पाचेही जवळपास २० टक्के काम प्रभावीत झाले असून अशी स्थिची राष्ट्रीय महामार्गाच्या अकोला विभागातंर्गत येत असलेल्या सात कामांची झाली आहे. या सर्व कामावर देशातील जवळपास १९ राज्यातील चार हजार मजूर कार्यरत आहे.
परिणामी या प्रकल्पांच्या कामामुळे गतीमान होऊ पाहणारे जिल्ह्यातील अर्थचक्रालाही फटका बसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. जिगाव सारख्या प्रकल्पाला गेल्या आर्थिक वर्षात अपेक्षीत निधी न मिळाल्यामुळे भूसंपादनाची अनेक प्रकरणे व्यपगत होण्याच्या मार्गावर असतानाच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आता हा स्कील्ड लेबर वर्ग आपल्या गावी पलायन करत आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिगाव प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या काही कामे स्थानिक नागरिकांनी बंद पाडल्यामुळे तेथील मजुरांनी प्रारंभीच स्वगृहीचा रस्ता धरला होता. उरला सुरला लॉकडाउनचाही परिणाम त्यावर झाला. त्यानंतर ३० मार्चच्या आसपास अत्यावश्यक सेवेतंर्गत महत्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मात्र तोवर बराचसा मजूर वर्ग हा निघून गेला होता.
आता जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असून देशातील कोरोना संसर्गाची एकंदर स्थिती पाहता बराचसा मजुर वर्ग हा घरी जात आहे. त्यामुळे विकास कामांची गती कायम राखण्याची समस्या निर्माण होत आहे. जिगाव प्रकल्पाचे समन्वयक कार्यकारी अभियंता सुनील चौधरी यांनीही यास दुजोरा दिला आहे.
अकोला मंडळातंर्गत राष्ट्रीय महामार्गाची बुलडाणा जिल्ह्यात जवळपास सात कामे सुरू असून या कामावरील सुमारे २०० पेक्षा अधिक प्रशिक्षीत मजूर वर्ग हा यापूर्वीच निघून गेला आहे. त्यामुळे मान्सूनच्या तोंडावर या रस्त्यांच्या कामासह काही पुलांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची समस्या यंत्रणेसमोर उभी ठाकली आहे. अन्य महामार्गाचीही कामे यामुळे प्रभावीत होत आहे. मात्र सात कामावरील मजूर वर्ग हा स्वगृही परतला असल्याचे राष्ट्रीय महामार्गचे खामगाव विभागातील उप अभियंता के. बी. दंडगव्हाळ यांनी सांगितले.
जिगाव प्रकल्पावरही उंचीवरील सेंट्रींगची कामे करणारा प्रशिक्षीत कामगार वर्ग परत जात असल्याने या कामांना फटका बसत आहे. त्यामुळे मुख्य धरणाच्या ठिकाणी कामे प्रभावीत होत आहे.
सहा एप्रिल रोजीच उत्तर प्रदेशातील ५०१ मजूर हे श्रमजीवी एक्सप्रेसद्वारे भुसावळवरून लखनऊसाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाने परराज्यातील मजुरांना त्यांच्या स्वगृही जाण्यासाठी व्यवस्था करणे सुरू केल्यामुळे वर्तमान स्थितीत कामावर असलेल्या अनेक मजुरांना आता गावाकडे वेध लागले आहे.

‘समृद्धी’ वरील ९० वाहने उभी
समृद्धी महामार्गाच्या कामावरील अप्रशिक्षीत मजूर वर्ग सध्या काम उपलब्ध झाल्याने खूश असला तरी कामाची व्यापकता पाहता बुलडाण्यातील दोन पॅकेजतंर्गत कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ४५० वाहनांपैकी ९० वाहने टायर खराब झाल्याने बंद पडली आहे. परिणामी कामाला फटका बसत आहे. औरंगाबादसह, अकोला व अन्य ठिकाणची टायरची दुकाने बंद आहेत. औरंगाबाद रेडझोन असल्याने तेथून बुलडाण्यात टायर घेऊन वाहन येत नसल्याची अडचण आहे. समृद्धी महामार्गावर दोन पॅकेजमध्ये सुमारे तीन हजार मजूर काम करत आहे. या दोन्ही पॅकेजमधील ३६ मजुरांनी स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या कामावर सध्या ट्रक चालक, अवजड यंत्र हाताळणारे प्रशिक्षीत कामगारांची कमतरता आहे.

Web Title: Development work hampered by labor migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.