ज्येष्ठांच्या कोविड लसीकरणासाठी 'देव्हडे' परिवाराचा पुढाकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:00+5:302021-03-21T04:34:00+5:30
चिखली : सामाजिक कार्यात कायम अग्रणी राहणाऱ्या येथील देव्हडे परिवाराने कोविड लसीकरण मोहिमेतही हिरिरीने पुढाकार घेतला असून आपल्या प्रभागातील ...
चिखली : सामाजिक कार्यात कायम अग्रणी राहणाऱ्या येथील देव्हडे परिवाराने कोविड लसीकरण मोहिमेतही हिरिरीने पुढाकार घेतला असून आपल्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण व्हावे व त्यांची गैरसोय होऊ नये, या अनुषंगाने लसीकरणासाठी नोंदणीपासून ते प्रभागातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यायेण्यासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली.
संपूर्ण जग मागील वर्षापासून कोरोना महामारीसोबत लढा देत आहे. लस आल्याने दिलासा मिळाला असला तरी बेफिकिरीमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या महामारीपासून आपल्या प्रभागातील नागरिकांना वाचविण्यासाठी १०० टक्के लसीकरण गरजेचे असल्याचे हेरून
प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक गोविंद देव्हडे व प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका विमल देव्हडे यांनी लसीकरणाच्या मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण होण्यासाठी लसीकरणासाठी नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यासह लसीकरण कोठे आणि कधी होईल, याची माहिती ज्येष्ठांना देण्यात येत आहे. तथापि नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी स्वत:च्या वाहनाचा वापर करून नागरिकांना त्यांच्या घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी उचलली आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून स्वत: वाहन चालवून व ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करत नागरिकांना लस देण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत नेणे व लसीकरण झाल्यानंतर घरापर्यंत आणून सोडण्याच्या कार्याबद्दल देव्हडे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. लसीकरण मोहिमेत भाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाह नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी केले आहे.
माझा प्रभाग माझी जबाबदारी !
देशातील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्याप्रमाणे केंद्रातील भाजपा सरकारची आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. सरकारने सुरू केलेले लसीकरण १०० टक्के सुरक्षित असून समाजात सामूहिक प्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी लसीकरण साहाय्यभूत ठरणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे व राष्ट्रहितासाठी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन नगरसेविका विमल रामदास देव्हडे यांनी केले आहे.
नऊ केंद्रांवरून लसीकरण
लसीकरणाच्या मोहिमेअंतर्गत चिखली तालुक्याला ४० हजार मोफत डोस दिले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरातील दोन खासगी रुग्णालये अशा एकूण नऊ केंद्रांवरून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत ५ हजार जणांचे लसीकरण झाले. तीन महिन्यांत ३५ हजार जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.