एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका!
By अनिल गवई | Published: May 26, 2024 08:55 PM2024-05-26T20:55:09+5:302024-05-26T20:55:17+5:30
बुलढाण्यात भाविक अडकले; चार ते पाच वाहनांवर उन्मळून पडली झाडे
खामगाव: तालुक्यातील लोणी गुरव येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना रविवारी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. यावेळी झाडे उन्मळून पडल्याने चार ते पाच कारचे नुकसान झाले. वाहतूक कोंडी झाल्याने हजारो भाविक विविध रस्त्यांवर अडकून पडले होते.
खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेला एकनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. रविवारी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता होती. गत सप्ताहभरापासून आयोजित धार्मिक उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी होती. दरम्यान, रविवारी महाप्रसादासाठी मोठ्यासंख्येने भाविक येथे जमले होते. सायंकाळी अचानक आलेल्या पावसासह चक्रीवादळामुळे लोणी गुरव येथे आलेल्या पाहुणे मंडळीच्या चार ते पाच गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे तसेच घरावरील टिनपत्रे उडाल्याने मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी किन्ही महादेव, नागापूर परिसरात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.
चांदे कॉलनीत कारवर कोसळला वृक्ष
शहरातील चांदे कॉलनीतील संत गजानन महाराज मंदिर परिसरात एका उभ्या कारवर वृक्ष पडल्याची घटना घडली. शेगाव रोडवर खामगाव येथून शेगाव येथे जात असलेल्या एमएच १४ २१९६ क्रमाकांच्या एसटीबसवर टपरी उडाली होती. त्याचवेळी संजिवनी कॉलनीतील काही घरांवरील टिनपत्रे उडाली.
शहर पोलीस स्टेशनजवळ कोसळले झाड
शहर पोलीस स्टेशनच्या आवारातील झाड पोलीस वसाहतीच्या दिशेने कोसळले. त्याचवेळी आणखी एक झाड पोलीस स्टेशनच्या आवारातच पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.