धार्मिक स्थळानजीक ध्वज लावल्याने ढालसावंगीत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:16 PM2018-08-17T18:16:01+5:302018-08-17T18:21:24+5:30
धार्मिक स्थळानजीक असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी ध्वज लावून आक्षेपार्ह्य लिखाण असलेली चिठ्ठी ठेवण्यात आल्याने १७ आॅगस्ट रोजी ढालसावंगी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
धाड : बुलडाणा तालुक्यातील धाड लगत असलेल्या ढालसावंगी येथे अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळानजीक असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी ध्वज लावून आक्षेपार्ह्य लिखाण असलेली चिठ्ठी ठेवण्यात आल्याने १७ आॅगस्ट रोजी ढालसावंगी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती सामान्य केली. दरम्यान, या प्रकरणी धाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गावातील तणावपूर्ण स्थिती पाहता ढालसावंगी येथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १६ आॅगस्टला मध्यरात्री दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ध्वज लावून धाड गावामध्ये मधल्या काळात झालेल्या वादग्रस्त घटनांच्या पृष्ठभूमीवर आक्षेपार्ह्य लिखाण केलेली चिठ्ठी ठेवली होती. १७ आॅगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर तेथे मोठा जमाव एकत्र येऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, तहसिलदार सुरेश बगळे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी, नायब तहसिलदार माळी, मंडळ अधिकारी अशोक शेळके यांनी ढालसावंगी गाठले. दरम्यान, प्रारंभी धाडचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळ गाठून अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळालगतच्या बांधकामावरील तो ध्वज आणि चिठ्ठी ताब्यात घेऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून शांततेचे आवाहन केले. दुसरीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनीही लगोलग ढालसावंगी व धाड गाठून ढालसावंगीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, धाडचे सरपंच व शांतता समिती सदस्य यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सोबतच ढालसावंगीत पोलिस बंदोबस्तही तैनात केला. इमाम अमीर शहा चंदू शहा यांनी धाड पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली.
धार्मिक स्थळानजीक ध्वज लावून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांचा शोध लावून कारवाई करण्यात येईल.
- दिलीप भुजबल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा.