खामगाव परिसरात दुबार पेरणीस प्रारंभ!
By admin | Published: July 15, 2017 12:59 AM2017-07-15T00:59:04+5:302017-07-15T00:59:04+5:30
घाटाखालील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घाटाखालील विविध तालुक्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत शेतमशागतीची कामे उरकून पावसाळा सुरू होत असल्याचे समजून पेरणी उरकून घेतली; परंतु यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. जुलै महिन्यातही असाच प्रकार काही शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. घाटाखालील विविध तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पेरण्यासोबतच दुबार-तिबार पेरण्याही सुरू असल्याचे चित्र दिसून येते.
बोरखेड : परिसरात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे कोरडवाहू पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या सुरूही केल्या आहेत.
बोरखेड, पळसोडा, सोनाळा, पिंगळी, वारखेड, सगोडा आदी भागात १६ जून रोजी पावसाने हजेरी लावली. त्या आधारे जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकरी अधिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांची पेरणी रखडली. परिणामी, या भागात पंचवीस दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे जमिनीतून अंकुरलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. अखेर शेतातील पीक जिवंत ठेवण्यासाठी कुठलीही पाणी व्यवस्था नसल्याने बरेच शेतकऱ्यांनी शेतातील पीक वखरून टाकले. पुन्हा १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून या भागात पावसाचे आगमन झाल्याने पेरणीसह दुबार पेरणीला वेग आला आहे; मात्र पेरणीला खूप उशीर झाल्याने शेतात कोणते पीक पेरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
खरिपाच्या पेरणीला झालेला उशीर, नैसर्गिक लहरीपणामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्याने आज रोजी पेरणीसाठी खत बियाण्यासाठी पैसा कोठून उपलब्ध करावा, या चिंतेत शेतकरी वर्ग दिसत आहे. नैसर्गिक कोपामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्याला बसत आहे, तरी शासनाकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.