शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:01+5:302020-12-31T04:33:01+5:30
सिंदखेडराजा : तालुक्यात होऊ घातलेल्या ४३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप ...
सिंदखेडराजा : तालुक्यात होऊ घातलेल्या ४३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने तहसील परिसराला यात्रेचे स्वरूप आले हाेेते. दरम्यान,शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ वाढवून देण्यात आली हाेती.
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींतील एकूण ३५७ सदस्य पदासाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी बुधवारी तहसील परिसरात गर्दी केली होती. राज्य निवडणूक विभागाने मध्यंतरी आलेल्या सलग सुट्या व ऑनलाइन यंत्रणेतील अडचणी लक्षात घेऊन आज शेवटच्या दिवशी दुपारी ३ पर्यंत असलेली अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ करून ५.३०पर्यंत वेळ वाढवून दिला आहे, तर अनेक अर्ज ऑफलाइन घेण्याच्या सूचना दिलेल्या असल्याने ऑनलाइन अर्ज भरू न शकणाऱ्या ग्रामस्थांनी ऑफलाइनसाठी गर्दी केली होती.
४३ गावांसाठी नऊ अधिकारी
अर्ज भरण्याच्या कामात कुठेही अडचण येऊ नये यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याकडे प्रत्येकी पाच गावांचा भार सोपविला आहे. त्यामुळे गर्दी असली तरीही यंत्रणा सज्ज असल्याने शेवटच्या वेळेपर्यंत कोणताच गोंधळ उडाला नाही. या सर्व यंत्रणेवर तहसीलदार सुनील सावंत हे लक्ष ठेवून हाेते.
झेरॉक्स सेंटरवर गर्दी
कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज भरण्यासाठी आलेले ग्रामस्थ अनेक प्रकारच्या नकला काढण्यासाठी अभिलेख कक्षात गर्दी करीत हाेते. तहसील परिसरातील झेरॉक्स सेंटर, सीएससी सेंटर गर्दीने फुलून गेले होते.
१७ सदस्य असलेल्या दोनच ग्रामपंचायती
तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींमध्ये सर्वांत मोठ्या १७ सदस्य असलेल्या दोनच ग्रामपंचायती आहेत. दुसरबीड व साखरखेर्डा या ग्रामपंचायती मोठ्या असल्याने येथील चुरस उत्सुकतेचा विषय आहे. तालुक्यात १३ सदस्य असलेल्या ३, ९ सदस्य असलेल्या ७, ११ सदस्य १, तर सात सदस्य असलेल्या ३० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १४१ प्रभागांत ही निवडणूक होत आहे.