ढोरपगाव परिसराला गारपीट, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
By विवेक चांदुरकर | Published: April 9, 2024 05:12 PM2024-04-09T17:12:26+5:302024-04-09T17:12:54+5:30
मका, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान : सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस
ढोरपगाव : परिसरातील पिकांना ९ एप्रिल रोजी दुपारी गारपीटचा तडाखा बसला. यामुळे सोंगणीला आलेले मका, ज्वारी, कांदा आणि गहु या पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपीटमुळे शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला आहे.
खामगाव तालुक्यातील ढोरपगाव, वडजी भेंडी, बेलखेड, कवडगाव, अंबरगड, चिचखेड, काळेगाव, दिवठाणा, वर्णा, रोहणा, निमकवळा या परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजतापासून अचानक गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहु, केळी बागांचे नुकसान झाले. गहू, ज्वारी, मका सोंगणीला आले आहे. काही शेतकर्यांची सोंगणी आटोपली असून, बहूतांश शेतकर्यांची सोंगणी बाकी आहे. आठ दिवसात पीक घरामध्ये येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या गारपीटीने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला. शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. या आठवड्यात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. अवकाळीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी शेतकरी हैराण झाले आहेत.
सर्वेक्षण करून भरपाइ देण्याची मागणी
पिक घरात येण्याच्या अवस्थेत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित प्रशासनाने पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे..
फोटो आहे.