मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:34 AM2020-04-21T10:34:22+5:302020-04-21T10:34:32+5:30
संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. यामुळे या आजाराच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची सर्वाधिक भीती आहे. संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
सध्या ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातही हा आकडा २१ वर पोहचला होता. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ७ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जगभरात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे झालेल्या मृतकांमध्ये मधुमेह व तत्सम आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या पृष्ठभूमीवर मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण इतर रुग्ण किंवा निरोगी व्यक्तींच्या तुलनेत या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिशयक कमी असते. त्यांना प्रादुर्भावाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. हा धोका टाळण्यासाठी या रुग्णांनी साधा ताप, सर्दी किंवा खोकला आल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावा. मधुमेह आटोक्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ठरवून दिलेले औषध न चुकता नियमितपणे घेत पथ्य पाळणेही महत्त्वाचे ठरते. सध्या ‘लॉकडाउन’मुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे शक्य नसले तरी घरातच ही प्रक्रिया करावी. नियमित व्यायाम, योगासन, प्राणायाम केल्यास मधुमेहाचे रुग्ण इतर रुग्णांपेक्षा तंदुरुस्त राहू शकतात. शक्यतो बाहेर पडू नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यास कोणत्याही वस्तुला स्पर्श करू नये, बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावे आदी बाबींची खबरदारी मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावी, असे आवाहन मधुमेह तज्ज्ञ डॉ. अशोक बावस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना अधिक धोका
सध्याच्या धकाधकीच्या युगात मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. मात्र तरुण रुग्णांच्या तुलनेत ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांनी या गंभीर ‘कोरोना’ आजारापासून स्तत:चा बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.