जळगाव जामोद, वरवट बकालला कार्यान्वीत होणार डायलिसीस सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 01:59 PM2019-08-11T13:59:44+5:302019-08-11T14:00:53+5:30

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात किडणीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

Dialysis Center to be operated Jalgaon Jamod | जळगाव जामोद, वरवट बकालला कार्यान्वीत होणार डायलिसीस सेंटर

जळगाव जामोद, वरवट बकालला कार्यान्वीत होणार डायलिसीस सेंटर

Next

- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खारपाणपट्ट्यातील जळगाव जामोद व वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये १५ आॅगस्टपासून स्वतंत्र डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक सेंटरवर ४ मशीन बसविण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकी १ किडणी रोग तज्ज्ञ, २ टेक्नीशीयन व एका सिस्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे डायलिसीसच्या रुग्णांची भटकंती थांबणार आहे.
खारपाणपट्ट्यातील या भागामध्ये स्थानिक पातळीवर डायलिसीसची सुविधा अत्यंत गरजेची होती. त्याअनुषंगाने आता प्रत्यक्ष जळगाव जामोद आणि वरवट येथे अनुषंगिक केंद्रे कार्यान्वीत होत आहेत.
जिल्ह्यात शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव व मलकापूर तालुक्यातील काही भाग खारपाणपट्ट्यात येतो. जवळपास १४० पेक्षा जास्त गावांचा यामध्ये समावेश आहे. येथे किडणीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना वेळोवळी डायलिसीसची गरज भासते. सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोन वेळा ही प्रक्रिया करणे गरजेचे असते. याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डायलिसीस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या शेगाव ८, खामगाव ६ व बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ मशीनची सुविधा आहे.
जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येत असलेल्या जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात किडणीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. येथे डायलिसीसची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपरोक्त ठिकाणी जावे लागत होते.
यासाठी जळगाव जामोद व वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसीस सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा स्वातंत्र्यदिनाच्या मूहुर्तावर सुरू होणार आहे. यामुळे किडणीच्या आजाराच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.


खासगी रुग्णालयातील खर्च न परवडणारा
किडणीच्या रुग्णांना आवश्यक असणारे डायलिसीस खासगी रुग्णालयात केल्यास त्याचा खर्च ३ ते ४ हजार रुपये एका वेळेला येतो. काही मोजके रुग्ण वगळता सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना हा खर्च न परवडणारा आहे. जिल्ह्यात पूर्वी जिल्हा समान्य रुग्णालयासह दोन ठिकाणी डायलिसीसची मोफत सुविधा उपलब्ध होती. यात आता आणखी दोन सेंटरची भर पडली असल्याने या रुग्णांना खूप मोठा आधार मिळाला आहे.

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका खारपाणपट्ट्यात येतो. यामुळे किडणीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी १५ आॅगस्टपासून जळगाव जामोद व वरवट बकाल येथे डायलिसीस सेंटर सुरू करण्यात येणार असून या सुविधेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा.
-डॉ. प्रेमचंद पंडीत,
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा

Web Title: Dialysis Center to be operated Jalgaon Jamod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.