कडक निर्बंधामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:45+5:302021-05-18T04:35:45+5:30
जिल्ह्यात वाढती काेराेना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या दरम्यान आपले सरकार व ...
जिल्ह्यात वाढती काेराेना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या दरम्यान आपले सरकार व सेतू केंद्रही बंद आहेत़ शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पाेर्टल सुरू करण्यात आले आहे़ या पाेर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २० मे आहे़ कडक निर्बंधामुळे शेतकरी मुदतीत अर्ज भरू शकणार नाहीत़ त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे़
राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत खरीप हंगाम लागवडीसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भात, केळी, बीटी कापूस, ज्वारी, मका व बाजरीची बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर २०मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे़ मात्र, आपले सेवा केंद्र तसेच सेतू केंद्र बंद असल्याने योजनेचा लाभ घ्यावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जिल्हास्तरावर कितपत दखल घेतली जाते याकडे आता लक्ष लागले आहे़
काेट
कडक निर्बंधामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात अजून भर पडली आहे़ शासन पातळीवर याचा विचार व्हावा आणि अर्ज भरण्याची तारीख वाढवून देण्यात यावी. अनुदानावर मिळणाऱ्या बियाण्याची खरीप हंगामात पेरणी करण्याचे नियोजन होते़ मात्र, ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने योजनेपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ याची दखल शासनाने घ्यावी.
विशाल शिंदे, शेतकरी, पाडळी शिंदे.