दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘लेखानिक’ची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:01+5:302021-02-26T04:48:01+5:30
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार ...
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहेत. बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता वाढलेली आहे. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांची मोठी अडचण आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी आवश्यक असणारा लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. शहरातील दिव्यांग शाळांनी लेखनिक उपलब्ध व्हावा, म्हणून सामान्यांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. दिव्यांगांच्या श्रेणीतील अंध, अस्थिव्यंग, मतिमंद या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. दहावी आणि बारावीत अंध विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते.
या विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून घेणे व त्यांना परीक्षेच्या काळात लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळांची असते. दिव्यांग शाळांच्या परिसरातील शाळा अथवा ओळखीच्या शाळांना पत्र पाठवून लेखनिकांची मागणी केली जाते आणि शाळा त्या विद्यार्थ्यांना लेखनिकही उपलब्ध करून देतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे लेखनिकांची अडचण निर्माण झाली आहे. सामान्यांच्या शाळांनी लेखनिकासाठी दिव्यांग शाळांना प्रतिसादच दिलेला नाही.
पालक काय म्हणतात...
दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सध्या मोठी अडचण निर्माण झालेली आहे. गणित विषय सोडल्यास इतर सर्व विषयांसाठी नवव्या वर्गाचा विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करू शकतो. परंतु गणित विषयासाठी त्यांना सहाव्या वर्गाचा लेखनिक पाहिजे.
सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अतिशय लहान असल्याने त्याचे पालक त्याला परीक्षेला पाठवतील की नाही? हा प्रश्नच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. शाळाही बंद आहेत. अशात लेखनिक शोधणे अवघड होऊन बसले आहे.