पोषण आहारात तफावत
By admin | Published: August 10, 2015 11:31 PM2015-08-10T23:31:08+5:302015-08-10T23:31:08+5:30
लोणार तालुक्यातील रायगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या कारभाराच्या चौकशीचे निर्देश.
लोणार (जि. बुलडाणा) : मेहकर विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी १0 ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तालुक्यातील रायगाव येथील जि.प.शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली असता शाळेवरील शिक्षक गैरहजर व शालेय पोषण आहाराचे माहे जून-जुलै २0१५ या दोन महिन्याच्या रेकॉर्डमध्ये आणि तांदळाच्या कट्टय़ाच्या वजनातही तफावत असल्याचे आढळून आले. दरम्यान, आ. रायमुलकर यांनी रायगाव जि.प.शाळेच्या कारभाराची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रप्रमुख जंगलसिंग राठोड व गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांना दिले आहेत. मराठवाड्यातील बन येथील कार्यक्रमाहून परत येत असताना आ.संजय रायमुलकर यांनी रायगाव येथील जि.प.शाळेला अचानकपणे भेट देऊन शाळेची पाहणी केली. यासोबतच आ.रायमुलकर यांनी शाळेतील शालेय पोषण आहाराच्या रेकॉर्डची तपासणी केली असता शाळेच्या शालेय पोषण आहाराचे माहे जून व जुलै या दोन महिन्याच्या रेकॉर्डमध्ये तफावत आढळून आली. तर शालेय पोषण आहाराचे तांदळाचे कट्टे वजनात कमी भरत असल्याचे यावेळी दिसून आले. यामुळे शालेय पोषण आहार पुरविणार्या कंत्राटदाराकडूनच पोषण आहाराच्या कट्टय़ातून तांदळाची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त करुन कंत्राटदाराची चौकशीची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे करणार असल्याचे आ.रायमुलकर यांनी यावेळी सांगितले. जि.प.शाळांसह अंगणवाड्यांनाही निकृष्ट दर्जाचे साहित्य कंत्राटदाराकडून पुरविल्या जात आहे. यामुळे शाळा व अंगणवाडीतील लहान लहान विद्यार्थ्यांना निकृष्ट पोषण आहाराचे वाटप होऊन त्यांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याचे यावेळी आ.रायमुलकर यांनी सांगितले. शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी याबाबत वेळोवेळी शाळेतून तसेच अंगणवाड्यातून विद्यार्थ्यांना वाटप होणार्या पोषण आहाराची तपासणी करणे गरजेचे असून पाल्यांना निकृष्ट दर्जाचे पोषण आहार वाटप होत असल्याच्या तसेच मांसाहार करणार्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अंडे मिळत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत चौकशी करुन कंत्राटदाराचे तसेच त्यास पाठीशी घालणार्या अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही आ.संजय रायमुलकर यांनी यावेळी सांगितले.