बुलडाणा जिल्ह्यातील गुरूजींची नाळ जुळली डिजिटल युगाशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 02:49 PM2017-11-28T14:49:32+5:302017-11-28T14:51:47+5:30
राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अॅप्स तयार केले आहेत.
ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अॅप्स तयार केले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून त्याचा वापर करत विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण देण्याचा प्रयास जिल्ह्यात सुरू असल्याने डिजिटल युगाशी गुरूजींची नाळ जुळल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता कात टाकली आहे. अनेक शाळांनी आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे. तर काही शाळा आय.एस.ओ. मानांकनाच्या वाटेवर आहेत. शासानाच्या डिजिटल इंडीया या उपक्रमाचे वारे जिल्हा परिषद शाळेतही वाहू लागले असल्याने जि.प.च्या शिक्षकांनीही डिजिटल शाळा या संकल्पनेचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. अनेक तरुण शिक्षकांनी स्वत: च्या मोबाईलवर अभ्यासपूर्ण वेबसाईची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५५ शाळा मोबाईल डिजिटल झाल्या असून त्यावर शैक्षणिक अॅप्स तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. बदलणाºया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांनीही एकाच महिन्यात सुमारे १०९ ‘शैक्षणिक अॅप्स’ तयार केले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील दोन, चिखली ४, देऊळगाव राजा २, मेहकर ७, खामगाव ६, संग्रामपूर ६, जळगाव जामोद ६, नांदूरा तालुक्यात ७६ असे एकूण १०९ शैक्षणिक अॅप्स एकच महिन्यात शिक्षकांनी तयार केले आहेत. या शैक्षणिक अॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकविल्या जात आहे. शिक्षकांनी हे बदलते तंत्रज्ञान अवगत केल्याने त्याचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेत डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे मिळत असल्याने विद्यार्थी सुद्धा स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे.
शिक्षक व्हॉट्स अॅप, फेसबुवरही अपडेट
शिक्षक व्हॉट्स अॅप, फेसबुक यावरही अपडेट झाले आहेत. व्हॉट्स अॅपवर जिल्ह्यातील शिक्षकांचे जवळपास १० ते १२ ग्रृप आहेत. यामुळे शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना वेळीच मिळत आहे.
असे चालते शिक्षण
शैक्षणिक अॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वर, व्यंजने, पाढे, गणीतातील सुत्रे आॅडीओ क्लिप एैकवल्या जात आहे. तसेच विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे व्हिडीओ दाखवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवघड निर्माण केली जात आहे. इतीहासातील घटनाक्रमही विद्यार्थ्यांच्या सहज स्मरणात राहिल यासाठी, व्हिडीओ चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जात आहे.