डिग्रस-देऊळगावमही रस्ता गेला खड्ड्यांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:27 AM2020-12-26T04:27:22+5:302020-12-26T04:27:22+5:30
देऊळगावमही : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत असून, वाहतूक हाेत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक ...
देऊळगावमही : परिसरात गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत असून, वाहतूक हाेत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक हाेत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये गावातील सांडपाणी साचले असून, डासांची उत्पत्ती हाेत आहे. त्यामुळे या परिसरातील रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
डिग्रस बु. येथील खडकपूर्णा नदीच्या पात्रातून गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन हाेत आहे. उत्खनन केलेल्या रेतीचे माेठ्या टिप्परच्या माध्यमातून वाहतुक करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक हाेत असल्याने डिग्रस-देऊळगावमही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये गावातील घाण पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे १८ डिसेंबर राेजी ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २८ डी ९०३४) खड्ड्यांमुळे उलटला. रस्त्याच्या बाजूलाच लहान सात ते आठ मुले खेळत होते. त्यांच्या जवळच हा अपघात घडला. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अपघातात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच वाळू वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी
डिग्रस बू येथील माजी सरपंच सैय्यद रशीद सैय्यद लतीफ, माजी उपसरपंच भगवान खुशालराव पाटील , माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मामा पऱ्हाड,विष्णुपंत वखरे,सैय्यद मुश्ताक सैय्यद पाशू,रमेश नारायण वाघ, पांडुरंग खुशालराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य बळीराम मान्टे, माजी तंटामुक्त अध्यक्ष फकिरा गोविंद वाळ यांनी पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रात्रंदिवस टिप्परने वाळूची वाहतूक
परिसरात दिवसरात्र जवळपास शंभर ते दीडशे टिप्पर रेतीची वाहतूक करीत आहेत.परिसरातील रस्त्याची क्षमता नसतानाही त्यावर माेठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन हाेत आहे. महसूल विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई हाेत असल्याने रेती माफियांचा मनोबल वाढलेले आहे. शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.