गजानन महाराज संस्थानतर्फे दररोज ५ हजार लोकांना अन्नदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:26 AM2020-04-17T01:26:32+5:302020-04-17T01:26:45+5:30
रोज ५ हजार लोकांना अन्नदान : श्री आनंद विसाव्यात पाचशेच्यावर खाटांची केली व्यवस्था
गजानन कलोरे
शेगाव (बुलडाणा) : येथील श्री गजानन महाराज संस्थानतर्फे कम्युनिटी किचन या उपक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन गरजूंना ५ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण केले जात आहे. याशिवाय भविष्यातील धोका लक्षात घेऊन आपत्ती काळात रुग्णांसाठी येथील श्री आनंद विसाव्यात पाचशेच्यावर खाटांचीदेखील अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.
‘विदर्भाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानही लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. ‘कम्युनिटी किचन’मार्फत दररोज २ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण सुरू आहे. शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पुरविण्यात येत आहेत. शहरात अडकून पडलेले मजूर, सामाजिक संस्थांनी शोधून काढलेल्या गरजू व्यक्तींनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे. २ एप्रिलपासून बुलडाणा येथे सकाळी १ हजार व संध्याकाळी १ हजार असे भोजन पाकिटांचे वितरण सुरू आहे.
दगडूशेठ गणपती ट्रस्टचा गरजूंना मदतीचा हात
पुणे : येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने पुण्यातील गरजू नागरिक, संस्था, रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे.
च्ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ५० आयसीयू आणि १०० आयसोलेशन बेड तयार करण्यात येत आहेत.
च्सुमारे ४ हजार जणांची दोन्ही वेळची विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात आली आहे़ अनाथ मुलांची संस्था असलेल्या श्रीवत्सला धान्यरुपी मदत, कासेवाडी वसाहतीतील १ हजार कुटुंंबांना ५ हजार साबणांचे वाटप करण्यात आले आहे़ ट्रस्टतर्फे ६ रुग्णवाहिकांची सोय केली आहे.
मुक्त विद्यापीठाचे दहा कोटी रुपये
नाशिक : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दहा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी ही माहिती दिली.