पत्नीला थेट आगामी विधानसभेच्या उमेदवारीची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:15+5:302020-12-30T04:44:15+5:30

चिखली : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक दांपत्यासाठी तसा खास आणि जोडीदाराला धन्यवाद देण्याचा. त्याच्या कायम स्मरणात राहील अशी ...

Direct gift of upcoming assembly candidature to his wife! | पत्नीला थेट आगामी विधानसभेच्या उमेदवारीची भेट !

पत्नीला थेट आगामी विधानसभेच्या उमेदवारीची भेट !

googlenewsNext

चिखली : लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक दांपत्यासाठी तसा खास आणि जोडीदाराला धन्यवाद देण्याचा. त्याच्या कायम स्मरणात राहील अशी भेट देण्याचा हा दिवस. या खास दिवशी आपल्या पत्नीला थेट ‘आगामी विधानसभेच्या उमेदवारीची’ भेट देत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी चिखली मतदारसंघात खळबळ उडवून दिली.

माजी आमदार राहुल बोंद्रे व त्यांच्या धर्मपत्नी हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा अ‍ॅड.वृषाली बोंद्रे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक एमआयडीसीमधील एका वेअर हाउसमध्ये ‘जंगी पार्टी’ आयोजित केली होती. गुलाबी थंडीत या ‘गुलाबी’ पार्टीला काँग्रेस कार्यकर्त्यांसह बोंद्रे समर्थक, हितचिंतक, नागरिकांची उपस्थित होती. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे सर्वत्र राजकीय रंग चढलेला आहेच. त्यात चिखलीसारख्या ठिकाणी राजकीय घडामोडी घडणार नाहीत तर ती राजकीय राजधानी कसली? इथे सतत राजकीय हालचाली सुरू असतातच. त्यात भर घालण्याचे काम राहुल बोंद्रेंनी सत्कारापश्चात आजवरच्या सुखी सहजीवनाचे गुलाबी अनुभव कथन करताना केले. यामध्ये त्यांनी आगामी विधानसभेबाबत मोठा खुलासा करताना ‘येत्या काळात काँग्रेसचा विधानसभेचा उमेदवार हा त्यांच्या पत्नी अ‍ॅड.वृषाली बोंद्रे राहतील’, असा ‘बॉम्ब’ टाकून मोठा धुराळा उडवून दिला आहे. सोबतच गत विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत खंत व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना त्यांनी त्यामागची कहाणी विशद केली. गतवेळच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडल्या गेले. या निवडणुकीत काँग्रेसकडून अ‍ॅड.वृषाली बोंद्रे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असा सर्वांचा आग्रह होता; तथापि अ‍ॅड.वृषाली बोंद्रेदेखील यासाठी इच्छुक होत्या. मात्र, ‘सर्व पदे आपल्याच घरात नको’, या भावनेतून त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली. या निर्णयाने पालिका काँग्रेसच्या ताब्यातून तर गेलीच सोबतच अ‍ॅड. वृषाली बोंद्रे यांचाही हिरमोड झाला असल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी चक्क त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीची भेट दिली असल्याने अवघ्या मतदारसंघात या घोषणेची चर्चा होत आहे.

सावध ऐका पुढीला हाका !

राहुल बोंद्रेंचा राजकीय इतिहास पाहता त्यांच्या दोनवेळचा पराभव हा महिलांनी केला आहे. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत रेखाताई आणि आता श्वेताताई या दोन्ही ‘ताईं’नी बोंद्रेंना विधानसभेत पराभूत केले असल्याने ‘सावध ऐका पुढील हाका’ या उक्तीनुसार राहुल बोंद्रेंनी साधव भूमिका तर घेतली नसेल? की महिलांविरोधात निवडणूक जिंकणे शक्य नाही म्हणून महिला विरोधात महिला उमेदवार देण्यासाठी हा पत्ता त्यांनी फेकला, की ही केवळ एक राजकीय खेळी आहे, असे अनेक तर्कविर्तक सध्या मतदारसंघात लावले जात आहेत.

Web Title: Direct gift of upcoming assembly candidature to his wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.