पोलीस महासंचालकांकडून ‘लोकमत’ वृत्तांची दखल! कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:46 PM2018-08-30T15:46:28+5:302018-08-30T15:48:39+5:30
‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली.
खामगाव: ‘वाहतूक पोलिसांची खाबुगिरी’ आणि ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’या दोन वृत्तांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून थेट दखल घेण्यात आली. या दोन्ही घटनांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेत. त्यामुळे पोलिस प्रशासनासोबतच कृषी विभागात खळबळ उडाली आहे.
वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये ‘वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीला लगाम लागेना!’ या मथळ्याखाली बुधवार २९ आॅगस्ट रोजी प्रकाशित केले होते. तर गुरूवार ३० आॅगस्ट रोजी ‘उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात महिलेची छेडछाड’ हे वृत्त प्रकाशित केले. उपरोक्त दोन्ही बातम्या ‘आॅनलाईन लोकमत’लाही प्रसारीत करण्यात आल्या. तसेच या बातम्यांची लिंक ‘डिजिपी महाराष्ट्र’ या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटसोबत शेअर करण्यात आली. त्यानंतर या दोन्ही प्रकरणांची राज्याचे पोलिस महासंचालक यांनी गंभीरतेने दखल घेतली. त्यांच्या ‘डिजिपी महाराष्ट्र’ या ऑफिशियल अकाऊंटवरून दोन्ही घटनांसंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
‘लोकमत’च्या निर्भिडतेचे कौतुक!
पोलिसांच्या खाबुगिरीचा भंडाफोड केल्याबद्दल ‘लोकमत’चे विविध स्तरावरून कौतुक होत आहे. पोलिसांची खाबुगिरी उघड करण्यासोबतच महिलेवरील अत्याचाराला वाचा फोडल्याबद्दल ‘सोशल’ मिडीयावर ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. दरम्यान, आता राज्याच्या पोलिस महासंचालकांकडूनही ‘लोकमत’ची दखल घेण्यात आली आहे.