संचालकांना खुलासे सादर करण्याचे निर्देश
By Admin | Published: July 12, 2017 12:56 AM2017-07-12T00:56:52+5:302017-07-12T00:56:52+5:30
तूर खरेदी गैरव्यवहारप्रकरणी खुलासा सादर करण्याचे निर्देश
संग्रामपूर : संग्रामपूर शासकीय तूर खरेदी केंद्रावर झालेल्या तूर खरेदी गैरव्यवहारप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून, चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये गंभीर स्वरूपाचे आक्षेप आढळल्याने सहायक निबंधकांनी कृउबास व खविसंचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालकांना व व्यवस्थापकांना १४ व १५ जुलै रोजी या दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे.
संग्रामपूर खरेदी-विक्रीचे संचालक मोहन रामराव पाटील व अॅड. वीरेंद्र झाडोकार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी तूर खरेदी केंद्रावर झालेल्या अहवालाबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये प्राप्त झालेल्या अहवालामध्ये खविसंने विनाटोकन मोजमाप केल्याचे, ४९८ क्विंटल तूर ही मोजमापापेक्षा जास्त पाठविल्याचे तसेच ७६०.७५ क्विंटल तूर ही निनावी वेअर हाउसला पाठविण्याचे उघड झाले आहे. बनावट काटेपट्ट्या व धनादेश वाटपातसुद्धा गैरप्रकार केल्याचे सिद्ध झाले आहे.