दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:16 PM2020-03-20T17:16:11+5:302020-03-20T17:16:16+5:30
निधीची तरतूद नसल्याने काही दिव्यांगाची शिष्यवृत्तीसाठी फरफट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे निधीची तरतूद नसल्याने काही दिव्यांगाची शिष्यवृत्तीसाठी फरफट होत आहे.
केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय अपंग वित्तीय साहाय्यता संस्थेद्वारा दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्यात येतात. दिव्यांगासाठी विविध शिष्यवृत्तीच्या योजना राबवण्यिात येतात. परंतू समाज कल्याण विभागाकडे निधीची तरतूद नसल्याकारणाने काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे दिसून येते. खामगाव येथील मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी लिखित मनिष खेतान हा इयत्ता सहावीत असताना शाळेमार्फत सुरू प्रक्रिया पूर्ण करून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता.
हा विद्यार्थी दिव्यांग असून त्याला संस्थेमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांनी जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाकडे अनेक वेळा पाठपुरवा केला. समर्ग शिक्षा अभियानकडेही अर्ज केला आहे. परंतू दोन वर्षापासून विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. परंतू निधीची तरतूद नसल्याने काहींना शिष्यवृत्ती दिल्या जाऊ शकत नाही. निधी मिळताच शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.
- मनोज मेरत,
समाज कल्याण अधिकारी, जि. प. बुलडाणा.