पेनटाकळी प्रकल्पातून ६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:01 AM2020-08-17T11:01:16+5:302020-08-17T11:01:23+5:30
रविवारी दुपारी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मेहकर: जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या पेनटाकळी प्रकल्प ८० टक्के भरल्याने याप्रकल्पाच्या दोन वर्कद्वारातून ६९७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी दुपारी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रकल्पा घालील १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या नऊ दरवाजापैकी दोन दरवाजे सध्या १० सेमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास प्रसंगी आणखी पाण्याचा विसर्ग या प्रकल्पातून केला जावू शकतो, असे सुत्रांनी सांगितले. प्रकल्पात पाण्याची वाढती आवक पाहता कार्यकारी अभियंता सुधीर सोळंके यांच्या सुचनेनंतर दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करतेवेळी पेनटाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एस. बी. चौगुले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पी.व्ही. तुरुकमाने, बी. एम. काकडे व अन्य उपस्थित होते. २००६ मध्ये या प्रकल्पाचे नऊही गेट उघडण्यात आले होते. २०१३ मध्येही दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला होता.
खडकपूर्णाचेही ११ दरवाजे उघडले
बुलडाणा: खडकपूर्णा प्रकल्पातूनही सायंकाळी सव्वा सहा वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या ११ दरवाजातून १३ हजार क्युसेक वेगाने हा विसर्ग होत आहे.
गेल्या १५ दिवसापासून प्रकल्पातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आरओएसच्या नियमांचे पालन करत हा पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे ११ दरवाजे हे ३० सेमीने उघडण्यात आले असून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने हा निर्णय घेतला.