झेंडूच्या फुलावर रोगाचा प्रादुर्भाव; सणाच्या मुहुर्तावर शेतकरी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 07:23 PM2023-10-22T19:23:19+5:302023-10-22T19:23:28+5:30
कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात तर घट तर झालीच आहे.
दसरा, दिवाळी सण काही दिवसांवर येवून ठेपलाय. या सणामध्ये झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेतकरी वर्ग शेतीला जोड व्यवसाय म्हणून झेंडू फुलांची शेती करीत असतात व झेंडू फुलांची विक्री करून काही प्रमाणात का असो ना काही नफा कमविण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यावर्षी कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रात आली आहे.
कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात तर घट तर झालीच आहे. मात्र, झेंडू फुलांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू उत्पादनासाठी लावलेल्या खर्च देखील यावर्षी न निघण्याचे चिन्हे दिसत आहेत. दसरा दोन दिवसांवर येवून ठेपला असूनही रोगाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या झेंडू फुलाला व्यापारी विकत घेण्यास तयार नाही.
बुलढाण्यापासून काही अंतरावर असलेले नांद्राकोळी येथील शेतकरी बालु भिवसन हुडेकर हे दरवर्षी आपल्या शेतात सणासुदीच्या वेळेस झेंडू फुलांची शेती करीत असतात. मागील वर्षी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून थेट शेतातून त्यांच्याकडून 35 ते 40 रुपये किलोप्रमाणे झेंडू फुलांची खरेदी केली होती. मात्र, यावर्षी त्यांच्या शेतातील झेंडू फुलावर कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने रोग पडला आहे. यामुळे यावर्षी त्यांचा उत्पादन खर्च देखील निघेल की नाही? याची त्यांना शास्वती नाही. म्हणून अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.