मनसेची जिल्हा कार्यकारीणी बरखास्त; राज ठाकरेंनी घेतला संघटनात्मक बांधणीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 05:57 PM2018-10-24T17:57:04+5:302018-10-24T17:57:41+5:30
बुलडाणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असून २४ आॅक्टोबरला स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वर्तमान जिल्हा कार्यकारीणीच बरखास्त केली आहे.
बुलडाणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सध्या तीन दिवसांच्या बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असून २४ आॅक्टोबरला स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वर्तमान जिल्हा कार्यकारीणीच बरखास्त केली आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष म्हणून तुर्तास मदन राजे गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. बुलडाणा येथे राज ठाकरे यांचे सकाळी ११ वाजता कार्यकर्त्यांच्या गराड्यात आगमन झाले. स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी जिल्ह्यातील आजी, माजी पदाधिकार्यांची त्यानंतर लगोलग बैठक घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षनेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, संजय चित्रे, प्रविण मरगज, विदर्भ नेते विठ्ठल लोखंडकार, राजेश कदम, राजू उंबरकर, आनंददादा एमबडवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. बैठकीत त्यांनी जिल्ह्याच्या एकंदर स्थितीचा अंदाज पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जाणून घेतला. सोबतच आगामी निवडणुकींच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीकोणातून वर्तमान कार्यकारीणी बरखास्त करून तुर्तास सर्वाधिकार मदन राजे गायकवाड यांना दिले आहेत. प्रारंभी त्यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन खामगाव मार्गे बुलडाणा गाठले. दिवाळीनंतर संघटनात्मक बांधणीला जोर आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर दिवाळीनंतर मनसे संघटनात्मक बांधणीवर जोर देणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील काही निवडक पदाधिकार्यांना मुंबईत बोलावून चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांचा बुलडाणा जिल्हा दौरा होऊन मनसेची नव्या दमाची कार्यकारीणी गठीत करण्यात येणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी विठ्ठल लोखंडकार आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लोणारच महत्त्व जाणणार राज ठाकरे हे बुलडाणा जिल्ह्यात सध्या अगदी निवांतपणे दौरा करत आहे. २४ आॅक्टोबरला ते सायंकाळी लोणार येथे मुक्कामी असून २५ आॅक्टोबरला ते लोणार सरोवराची पाहणी करणार आहे. गेल्या पाच वर्षापासून लोणार सरोवराला भेट देण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यानुषंगाने आता त्यांचा योग जुळून आला असून अगदी सरोवरात उतरून ते राज्यातील छोट्या अशा पक्षी अभयारण्याची पाहणी करणार असल्याचे लोखंडकार म्हणाले.